Satara Accident News: साताऱ्यात इलेक्शन ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतताना तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू झाला. मयत तलाठी सातारहून भुईंज येथे आपल्या मूळगावी जात असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दोन महिन्यापूर्वी तलाठी म्हणून नियुक्ती झालेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रोहित अशोक कदम (वय, २८) असे मृत्यू झालेल्या तलाठीचे नाव आहे. रोहित कदम यांची विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी आलेवाडी येथे नियुक्ती झाली होती. इलेक्शन ड्युटी आटोपून रात्री उशीरा घरी जाताना पाचवडजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघात रोहित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरीत सातारा येथील जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हे इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जात असताना पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे- पाचवडदरम्यान त्यांच्या दुचाकीने रस्त्यात उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक दिली. या ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावले नसल्याचे चौकशीत उघड झाले. यामुळे रोहित यांची दुचाकी ट्रॉलीला धडकली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित कदम यांची दोन महिन्यांपूर्वीच तलाठी म्हणून नियुक्ती झाली असून एका वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.