सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह महापूर आलेल्या कृष्णा नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवली. या महिलेचा मृतदेह सात दिवसांनी सापडला आहे. महिलेचा मृतदेह घटना घडलेल्या ठिकाणापासून ८ किलोमीटर अंतरावर सापडला. महिलेने २७ जुलै रोजी नदीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे. संचिता साळुखे (वय २२) असं या महिलेचं नाव आहे. या घटनेत अक्षिता ( २ वर्षे) या चिमुकलीचाही मृत्यू झाला आहे.
गेल्या सात दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात शोध मोहिम राबवण्यात आली होती. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ७ दिवसांनी आईचा मृतदेह सापडला आहे.
सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता काही दिवसांपूर्वी आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला घेऊन माहेरी आली होती. कौटुंबिक वादातून या महिलने २७ जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेतली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.
२७ जुलै रोजी सुरू केलेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत आढळला. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला.
संचिता यांनी कृष्णा नदीच्या पात्रता उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधीच माहेरी आली होती. तिने दोन वर्षांच्या मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या केली, मात्र याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
वर्धा जिल्ह्यात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. विद्यार्थिनीने कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात घडली. पूजा रजानीअसं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.पूजा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. वैद्यकीय कारणामुळे ती कॉलेजमध्ये सतत गैरहजर असायची. हजेरी न भरल्यामुळे कॉलेज प्रशासनाने तिला परीक्षा देण्यापासून रोखले होते. यामुळे ती तणावात होती,अशी माहिती तिच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.