
धावत्या बसमध्येच चालकाना हृदयविकाराचा धक्का आला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत एसटी दुभाजकावर चढवली व बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. बसमध्ये ३१ प्रवासी होते. ही घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ वारुंजी गावच्या हद्दीत घडली. मात्र, आपल्या जीवाची पर्वा न करता ३१ प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विटा आगारातून स्वारगेटला जाण्यासाठी एसटी बस घेवून चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख हे दोघेजण कराडमध्ये आले. बस सकाळी विट्याहून निघाली होती. कराड बसस्थानकातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी पुणे-बंगळुरू महामार्गाने साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत एकूण ३१ प्रवासी होते. एसटी वारुंजी गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घालून तेथेच थांबवली.
बस दुभाजकावर धडकल्यामुळे प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली. वाहक फारुक शेख यांनी चालकांच्या केबिनजवळ जाऊन पाहिले असता त्यांना चालक बुधावले घामाघूम झाल्याचे दिसले. तसेच चक्कर येत असल्याचे ते म्हणत होते. त्यामुळे वाहक शेख यांनी त्यांना तातडीने जवळच्या साई रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच बुधावले यांचा मृत्यू झाला. दरम्यान सर्व प्रवाशांना दुसऱ्या एसटीतून पुढे पाठवले गेले. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
