वाईतील प्रतिथयश डॉक्टर, प्रतिभावान लेखक-कवी आणि नास्तिकतावादी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय ६०) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली त्यांची झुंज अखेर थांबली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
डॉ. अभ्यंकर यांनी वैद्यकीय सेवेसोबतच साहित्य सेवाही केली. लेखक, कवी, विज्ञानवादी लेखक, प्रभावी वक्ता, रंगकर्मी अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत होते. गंभीर आजार असूनही ते आपल्या क्षेत्रात कार्यरत राहिले. प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. अभ्यंकर यांची सातारा जिल्ह्यातील प्रख्यात स्त्री रोगतज्ञ, वक्ता, नाटककार, सामाजिक जाणीव असलेले विज्ञानवादी कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख होती. वाई येथील प्राज्ञ पाठ शाळा मंडळाचे ते विश्वस्त तर लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष होते.
पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. अभ्यंकर यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. १९९७ पासून ते वाई येथील त्यांच्या वडिलोपार्जित ‘मॉडर्न क्लिनिक’ या रुग्णालयातून वैद्यकीय सेवा देत होते. स्त्रीआरोग्य तज्ज्ञांच्या राष्ट्रीय काम विज्ञान समितीचे ते सचिव होते. अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी स्त्री आरोग्य विषयांवर आपले विचार मांडले आहेत.
पाळी मिळी गुप चिळी, संभोग का सुखाचा, जादुई वास्तव्य रिचर्ड डॉकिंस, मला शास्त्रज्ञ व्हायचंय, बायकात पुरुष लांबोडा, डॉक्टरांना भेटलेल्या खुमासदार माणसांबद्दल, डॉक्टर टेरेसा आणि इतर वल्ली, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, गरोदरपणात ग्रहण का पाळू नये आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अलीकडेच त्यांनी लिहिलेल्या आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, डॉ क्युटरस, राधिका सांत्वनमहे या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज माध्यमांवरही ते सातत्याने लेखन करत होते.