Khanada water crisis : खंडाळा व वाई तालुक्यातील उपसा सिंचन योजनांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Khanada water crisis : खंडाळा व वाई तालुक्यातील उपसा सिंचन योजनांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

Khanada water crisis : खंडाळा व वाई तालुक्यातील उपसा सिंचन योजनांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

Updated Feb 28, 2024 07:50 PM IST

Purushottam Jadhav on Khandala wai water crisis : खंडाळा व वाई तालुक्यातील उपसा सिंचन योजनांची कामं लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

Purushottam Jadhav
Purushottam Jadhav

Purushottam Jadhav on Khandala wai water crisis : खंडाळा व वाई तालुक्यातील पाणी प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या उपसा सिंचन योजनांना तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा व ही कामं लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत अशी मागणी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. 

पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं या प्रश्नी नुकतीच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोते यांची पुण्यातील सिंचन भवनात भेट घेतली. खंडाळा तालुक्यातील निरा देवधर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या उपसा सिंचन योजनांची कामे, खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दोन बलकवडी पोट कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या १४ गावांना नवीन उपसा सिंचन योजना तसेच, वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनलक्ष्मी योजनेतील कालवा प्रकल्पाच्या संदर्भात शिष्टमडंळानं कपोते यांच्याशी चर्चा केली.

गावडेवाडी, शेषनेरवाडी व वाघोशी या तीन उपसा सिंचन योजनांची संकल्पचित्रे व रेखाचित्रे मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडून प्राप्त झाली नसल्याचं शिष्टमंडळाच्या लक्षात आलं. त्यावर ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. 

पुरुषोत्तम जाधव यांनी मांडली तालुकावासीयांची व्यथा 

'दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आमच्या जमिनी कवडीमोल दराने औद्योगीकरणासाठी घेण्यात आल्या. आमच्या पूर्वजांना पाण्याचे गाजर दाखवून आमच्या जमिनीवर पुनर्वसन लादण्यात आले आणि आमच्या वाट्याचे पाणी आमच्या डोळ्यात देखत वर्षानुवर्ष सातत्याने पळवण्यात आले. कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या या पाणी प्रश्नासाठी तोंड उचकटताना आतापर्यंत दिसला नाही म्हणून आता संघर्ष अटळ आहे, असं जाधव म्हणाले. 

अन्यथा पाणी पुढं जाऊ देणार नाही!

तिन्ही उपसा सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध असून देखील रेखाचित्रांमध्ये काम अडकले आहे त्यामुळे ताबडतोब त्या कामाची पूर्तता करण्यात यावी आणि उपसा सिंचन योजनांची भूमिपूजन करून योजना कार्यान्वित करावी. तसे झाल्यास खंडाळा तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पुढील पिढीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायला तयार आहोत. आमच्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्याशिवाय आम्ही पाणी पुढं जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तुमचे रेखांकन आराखडे तातडीने करून घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बावडा येथील खंडाळा तालुक्याचे माजी सभापती ९४ वर्षीय एस वाय पवार यांनी हा प्रश्न लवकर सोडवा अन्यथा आम्ही प्राणांतिक उपोषण करू, असा इशारा दिला. यावेळी शामराव धायगुडे, मोरवे खंडाळा तालुका प्रमुख भूषण शिंदे उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर