Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Munde Resignation: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर संतपाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले आहे. सोमवारी रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीत फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्यास संगीतल्याची माहिती आहे. त्यामुळे आज मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे. वाल्मीक कराडचे या प्रकरणात नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, अजित पवार यांनी मुंडे यांची बाजू लावून धरत त्यांना अभय दिलं होतं. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यावर आता राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या करतांना आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे. ऐवढे सबळ पुरावे असतांना देखील कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याने आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याची चर्चा होती. नंतर एसआयटी आणि सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे लवकरच याप्रकरणाच्या सुनावणीला न्यायालयात सुरुवात होईल.
संबंधित बातम्या