Sarangi Mahajan News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असताना छत्रपती संभाजीनगरातून खळबळजनक माहिती समोर आली. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संगनमताने कट कारस्थान रचून कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली, असा गंभीर आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला. सारंगी महाजन यांच्या या आरोपांवर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे नेमके काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सारंगी महाजन म्हणाल्या की, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील कोट्यवधी किंमतीची जमीन माझ्या नोकराच्या. माझी परळीत ६३.५० आर जमीन होती, यातील ३६ आर जमीन फसवणूक करून विकण्यात आली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. नंतर तेथील रजिस्ट्रार ऑफिसला नेले आणि माझ्याकडून सही करून घेतल्या. नेमके जमीन कोणी खरेदी केली? हे आम्हाला माहिती नाही. यानंतर गोविंद बालाजी मुंडेंनी आम्हाला घरी नेऊन जेवू घातले आणि एका ब्लँक पेपरवर सह्या करायला सांगितल्या. मी नकार देताच त्यांनी मला सही न केल्यास धनुभाऊ आणि पंकजा ताई तुम्हाला परळी सोडू देणार नाहीत, अशी धमकी दिली, असे सांरगी महाजन यांनी म्हटले. एवढेच नव्हेतर सांरगी महाजन यांच्याकडून एक लाख रुपये घेतल्याचा त्यांनी आरोपी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला बाजूने कौल दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.