Maharashtra Assembly Session : 'बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांचीही कुचराई दिसत असल्याचं सांगत बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. तसंच, देशमुख यांच्या हत्येत दोषी आढळल्यास वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. आवादा एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडं खंडणी मागणाऱ्या व त्यासाठी कंपनीचा सुरक्षारक्षक व मॅनेजरला काही गुंडांनी मारहाण केल्यावरून या वादाची सुरुवात झाली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारणाऱ्या आणि धमकावणाऱ्या अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले या गुंडांना संतोष देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोप दिला होता. तसंच त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. याचा राग धरून नंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असं फडणवीस यांनी सांगितलं.
'संतोष देशमुख यांच्याबाबत जे झालं, ते अत्यंत दुर्दैवी आणि निर्घृण आहे. या हत्येमध्ये वाल्मिक कराड नावाच्या गुंडाचा हात असल्याचं अनेक सदस्यांनी नाव घेऊन सभागृहात सांगितलं. त्यामुळं मी देखील त्याचं नाव घेऊन सांगतो. वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात दोषी आढळला आहेच, पण देशमुख यांच्या खुनाशी त्याचा संबंध असल्यास त्याला सोडणार नाही. तो कोण आहे? कोणासोबत त्याचे फोटो आहेत हे न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसंच, या गुन्ह्यासह बीडमधील वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना मकोका लावण्यात येईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बीडमधील गुन्हेगारी आणि माफियाराजविषयी अनेक सदस्यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेऊन या सगळ्याची पाळंमुळं खोदून काढली जातील आणि कारवाई केली जाईल. कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या बाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी दोन पातळ्यांवर केली जाईल. त्यासाठी आयजी स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. तसंच, न्यायालयीन चौकशी देखील केली जाणार आहे. तीन महिन्यात चौकशी पूर्ण होऊन कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
'संतोष देशमुख हे एक उमदं नेतृत्व होतं. कोणाही व्यक्तीच्या जिवाचं मोल पैशात होऊ शकत नाही. मात्र, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं.