Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कराडच्या एका कार्यकर्त्याने त्याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याबाहेर स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
जवळपास महिन्याभराच्या तपासानंतर वाल्मिक कराडवर मकोका लावल्याचे एसआयटीकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यानंतर बीडमधील वातवरण चिघळले असून कराडच्या समर्थकांनी सकाळपासूनच परळीत आंदोलन सुरू केले. एवढेच नव्हेतर त्यांच्या समर्थकांनी परळी शहरात बसवर दगडफेक, टायर जाळणे, रस्ते अडविण्याचा प्रयत्न केले.बीड जिल्ह्यात २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असतानाही हे आंदोलन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कराडचा समर्थक दत्ता जाधवने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना समोर आली. या घटनेत त्याचे दोन्ही पाय गंभीररित्या भाजले. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बीड पोलीस अलर्ट झाले आहेत.
दरम्यान, कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी आपल्या मुलाच्या सुटकेच्या मागणीसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यातील पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. माझ्या मुलाने काहीही चुकीचे केलेले नाही आणि त्याची सुटका झाली पाहिजे. माझा मृत्यू झाला तरी मी इथून उठणार नाही,' असे पारुबाईंनी पोलिस ठाण्याबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या मुलाला फसवण्यामागे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर या स्थानिक आमदारांचा हात असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी कराडच्या आईने केली.
देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कराड यांनी पुण्यातील सीआयडीसमोर शरणागती पत्करली होती. गेल्या वर्षी ३१ डिसेंबररोजी तो सीआयडीसमोर हजर झाला होता. त्यानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कराडची १४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बीड जिल्ह्यातील केज कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कराडविरोधात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले असून बुधवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या