Beed News: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली. मात्र, अजूनही दोन आरोपी फरार असून त्यात वाल्मिक कराडचा समावेश आहे. वाल्मिक कराडला अद्यापही अटक न झाल्याने विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकणामुळे बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. विधीमंडळातही या घटनेचे पडसाद उमटले. बीडमध्ये अपहरण, गोळीबार, खंडणीयांसारख्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर नवनीत कॉवत यांची बीडच्या पोलीस अधिक्षकपदी निवड करण्यात आली. मात्र, तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहेत. आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश का येत आहे? राजकीय नेत्यांचा बीड पोलिसांवर दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील नेते अंबादास दानवे यांनी वाल्मिकी कराड हे नागपूरातील फार्म हाऊसवर आहे, मी त्याचा पत्ता देऊ शकतो, पण पोलीस त्याला पकडत नाहीत, असा दावा केला होता. विधीमंडळात ते बोलत होते. तर, शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
बीड तालुक्यामध्ये वाल्मिक कराडला वाल्मिक अण्णा म्हणून ओळखले जाते. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही, असे पंकजा मुंडे यांनी एका भाषणात म्हटले होते. वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करायचे. जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेसोबत आले. धनंजय मुंडे यांचे सर्व आर्थिक व्यवहार वाल्मिक कराड पाहत असे, अशीही माहिती आहे.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळेमुळे खणून काढणार असून मास्टरमाईंड कोणीही असून त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतले गेले, त्यामुळे सांगतो की , या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे? याचा विचार न करता कारवाई केली जाईल’, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.