Walmik Karad Mcoca : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. वाल्मिक कराड याच्यावर खंडणी प्रकरणात मकोका आणि हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्याला पहिल्यादांच बीड कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सादर केला.
आतापर्यंत वाल्मिक कराडच्या खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज न्यायालयात होत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आजची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात झाली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टातकराड याच्यावरील गुन्ह्याची यादी मांडली. ९ डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड याच्याशी दुपारी ३.२० ते ३.३० वाजता संभाषण केले होते.
त्याचवेळी संतोष देशमुख अपहरण झाले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता, असं अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले. ९ डिसेंबर दिवशी देशमुखहत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे झाले असल्याचे कॉल रेकॉर्ड आम्हाला मिळाले आहेत. आरोपी आणि कराड यांच्यात १० मिनिटांचे बोलणे झाल्याचा दावा तपास अधिकारी गुजर यांनी न्यायालयात केला. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक अडकल्याचे बोलले जात आहे.
अनिल गुजर यांनी न्यायालयात दावा केला की, संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली,त्या दिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान आरोपी सुदर्शन घुले,विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. एसआयटीने तपासादरम्यान कॉल ट्रेस केले. एसआयटीने शेकडो फोनकॉल तपासल्यावर आम्हाला ही माहिती मिळाली आहे.९ डिसेंबरला दुपारी ३ ते ३.१५ या काळात संतोष देशमुखचं अपहरण झाले होते. देशमुख अपहरण आणि तिन्ही आरोपींच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचा मोठा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
हत्या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यात काय बोलणे झाले याचा तपास करायचा असल्याने वाल्मिक कराडची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी,अशी मागणी अनिल गुजर यांनी कोर्टात केली.
त्याचबरोबर आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडने या आधी केलेल्या गुन्ह्यांची यादी सरकारी वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आली. कराडवर मकोका का लावण्यात आला, हे स्पष्ट करण्यासाठी त्याच्या गुन्ह्याची यादी कोर्टात मांडण्यात आली. कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने ९ बाबी कोर्टासमोर मांडल्या. त्यात हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना कराडने धमकी दिल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मकोकाच्या विशेष न्यायालयात हीसुनावणी इन कॅमेरा सुरू आहे. या सुनावणीसाठी केवळ न्यायाधीश, तपास अधिकारी, आरोपी, आरोपीचे वकील आणि सरकारी वकीलइतकेच लोकउपस्थित आहेत.
संबंधित बातम्या