बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. एक महिना उलटूनही हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीतील अधिकाऱ्यांचे आरोपी वाल्मीक कराड याच्याशी संबंध असल्याचे तसेच त्याच्यासोबत त्यांचे फोटो समोर आल्याने एसआयटीतील तपासावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे आज मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी एसआयटी बरखास्त करून नवीन एसआयटीची स्थापना केली आहे. नव्या एसआयटीत ९ ऐवजी ६ अधिकाऱ्यांचा समावेश असून याच्या प्रमुखपदी उप महानिरीक्षक बसवराज तेली कायम राहणार आहेत. नव्या एसआयटीत दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ.बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले होते. परंतु त्यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडबरोबर निकटचे संबंध असल्याने तसेच त्यांची नियुक्ती किंबहुना बदल्या कराड याच्या सांगण्यावरूनच झाल्याचे आरोप करण्यात येत होते. देशमुख कुटुंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर आक्षेप नोंदवले होते. जर तपास पथकातील अधिकारी कराडचे निकटवर्तीय असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार, असा सवाल देशमुख कुटूंबीयांनी केला होता. त्यानंतर राज्य सरकारने जुने विशेष तपास पथक बरखास्त करून नव्या पथकाची घोषणा केली.
१ - अनिल गुजर (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग बीड),
२ - महेश विघ्ने (पोलीस उपनिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग बीड)
३ - विजयसिंह जोनवाल (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग बीड)
४- आनंद शिंदे(पोलिस उपनिरीक्षक, केज)
५ -तुळशीराम जगताप (पीएसाय, गुन्हे अन्वेषण विभाग बीड)
६- मनोज वाघ( कॉन्स्टेबल, गुन्हे अन्वेषण विभाग बीड)
७ - चंद्रकांत काळकुटे, (पोलीस नाईक केज)
८- बाळासेहब अहंकारे (पोलीस नाईत, केज)
९ - संतोष गिते (कॉस्टेबल केज)
१ जानेवारी रोजी राज्य सरकारने उप महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. यात बीड जिल्ह्यातीलच अधिकारी, कर्मचारी घेण्यात आले होते. त्यातच एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत फोटो व्हायरल झाला. त्यानंतर यावर सर्वांनीच आक्षेप घेतला. निवडणुकीनंतर खांद्यावर गुलाल पडल्यावर वाल्मिकच्या गळ्यात गळे घालून जल्लोष करतानाचा फोटो समोर आल्याने देशमुख कुटुंबियांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला.
१ -किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
२ - अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)
३- सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)
४- अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)
५- शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)
६- दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)
संबंधित बातम्या