Jitendra Awhad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी याच्या फिल्मस्टाइल शरणागतीवरून आता अजित पवार टीकेच्या रडारवर आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना घेरलं आहे.
संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड याच्याच सांगण्यावरून झाली. तोच या हत्याकटाचा मास्टरमाईंड आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. हे आरोप झाल्यानंतर फरार झालेला वाल्मिक कराड काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांसमोर शरण आला. तो ज्या गाडीतून पोलीस ठाण्यात आला ती गाडी अजित पवार यांच्या ताफ्यात होती, असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. त्यावरून आता आव्हाड यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
आव्हाड यांनी पहाटे या संदर्भात ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचं गुपित बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलंय. त्यांनी उघड केलेलं गुपित अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणं व्हायला लागलं आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात?,’ असा सवाल आव्हाड यांनी केला.
'आज आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकार परळीसह बीडमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. ते मुंबई किंवा पुण्याला निघून जाणार आहेत. कारण, त्यांच्या मागे काही इसम सातत्यानं लागले आहेत, हे सांगतानाच, वाह रे महाराष्ट्र, असा उपरोधिक संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या