Santosh Deshmuk Case CID : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आज दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह फरार असलेल्या तिघांचा शोध घेतला जात असून या तिन्ही आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी दोन संशयितांना सीआयडीने ताब्यात घेतले आहे. यापैकी एक डॉक्टर आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख तीन आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी येथील डॉ. संभाजी वायबसे यांना उचलण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीना पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा संशय त्यांच्यावर आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती हाती येईल.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे हे तीन जण फरार असून बीड पोलीस व सीआयडीचे पथक त्यांच्या मागावर आहेत. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे. एसआयटीकडून गुरुवारी तिन्ही आरोपींचे फोटोसह परिपत्रक जारी करत आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल,असेही जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकात अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध केले आहेत. हे आरोपी कुठेही दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जो व्यक्ती यांची माहिती देईल त्याचे नाव गुपित ठेवले जाईल तसेच त्याला योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.
देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे एसआयटी पथक करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारूरच्या कासारी या गावातून डॉ. संभाजी वायबसे यांना ताब्यात घेण्यात आले. तर एसआयटीकडून धारूरमधील आणखी एकाला ताब्यात घेतल्यावायबसे यांच्यासह दोघांची चौकशी केली जात आहे. या तिघांचा संबंध वाल्मीक कराडशी असल्याचा आरोप आहे.
पवनचक्की चालकांकडून खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी आणि आता एसआयटीच्या माध्यमातून केला जात आहे. खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला असून आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे. वाल्मीक कराडला न्यायालयात हजर केले असता, केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वाल्मिक कराड सध्या बीडमधील तुरुंगात असून त्याच्याकडून अनेक घटनांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या