Beed Hatyakand Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित व राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड हा कायद्याच्या कचाट्यात पुरता अडकला आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बीड न्यायालयानं त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात आता अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात संशय आल्यानंतर तब्बल १९ दिवस फरार असलेला वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आला होता. त्यांच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, संतोष देशमुख हत्याकांडात त्याचा थेट सहभाग असून तो सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर होता. या आरोपांनंतर एसआयटीनं देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींची चौकशी सुरू केली. त्यात अनेक गोष्टी समोर आल्या.
अधिक तपासासाठी एसआयटीनं वाल्मिकच्या कोठडीची मागणी केली होती. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी सरकारी व एसआयटीच्या वकिलांनी वाल्मिकच्या कोठडीची गरज का आहे याबद्दल युक्तिवाद केला.
संतोष देशमुख यांच्या खुनाच्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या आरोपींमध्ये फोनवर १० मिनिटं बोलणं झालं होतं. देशमुख यांच्या अपहरणानंतर हे आरोपी वाल्मिक कराडशी बोलले होते. त्याच आधारे वकिलांनी वाल्मिकच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली.
सर्व आरोपी सराईत आहे. त्यांच्यावर इतरही अनेक गुन्हे आहेत. फरार असलेल्या कृष्णा आंधळे याला लपण्यासाठी कोणी मदत केली हे देखील तपासायचं आहे. तीन आरोपींमध्ये नेमकं काय बोलणं झालं याचाही तपास करायचा आहे.
वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती वकिलांनी यावेळी कोर्टात दिली. त्याच आधारावर वाल्मिक कराडवर मकोका म्हणजे संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं.
आरोपीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं शेवटी वाल्मिकला ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानुसार तो २२ जानेवारीपर्यंत एसआयटीच्या पोलीस कोठडीत असेल.
संबंधित बातम्या