मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dr Kumud Pawde: दलित लेखिका डॉ. कुमुद पावडे यांचं निधन; शिक्षक नोकरीसाठी नेहरुंनी केली होती मदत

Dr Kumud Pawde: दलित लेखिका डॉ. कुमुद पावडे यांचं निधन; शिक्षक नोकरीसाठी नेहरुंनी केली होती मदत

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 31, 2023 09:26 PM IST

Dr Kumud Pawde no more- संस्कृत विषयात प्रथम श्रेणीत एम एचे शिक्षण घेतलेल्यानंतरसुद्धा कोणतीही सरकारी अथवा खासगी शिक्षण संस्था एका दलित महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्यास धजावत नसल्याबद्दल डॉ. कुमुद पावडे यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना पाठवलं होतं.

डॉ. कुमूद पावडे
डॉ. कुमूद पावडे

ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्त्या, संस्कृत भाषेच्या पंडीत आणि ‘नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वूमन’ संघटनेच्या संस्थापक डॉ. कुमुद पावडे यांचे आज नागपूरमध्ये निधन झालं. त्या ८५ वर्षाच्या होत्या. डॉ. कुमुद पावडे यांनी लिहिलेलं ‘अंतस्फोट’ हे आत्मचरित्र गाजलं होतं. डॉ. कुमुद पावडे या अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात अनेक वर्ष संस्कृत विषयाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नागपूर विद्यापीठाने त्यांना 'संस्कृत पंडिता' म्हणून पदवी बहाल केली होती. डॉ. पावडे यांनी दलित महिलांच्या व्यथा मांडणारं भरपूर लिखाण केलं होतं. तसेच विपुल वैचारिक लेखन केलं आहे. डॉ. कुमुद पावडे यांनी सामाजिक आणि साहित्यिक चळवळीत आयुष्य वेचले होते.

डॉ. कुमुद पावडे यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३८ रोजी नागपूर येथे झाला होता. त्यांचे आईवडील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीतील कार्यकर्ते होते. डॉ. कुमुद पावडे यांचे प्राथमिक शिक्षण मोठ्या कष्टात झाले. शाळेत शिकत असताना त्यांना वर्गातील सहविद्यार्थी तसेच शिक्षकांकडून अवहेलना आणि मारहाण सहन करावी लागली होती. डॉ. कुमुद पावडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून संस्कृत विषयात एमए केले होते. शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. संस्कृत विषयात प्रथम श्रेणीत एम एचे शिक्षण घेतलेल्यानंतरसुद्धा कोणतीही सरकारी अथवा खासगी शिक्षण संस्था एका दलित महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्यास धजावत नसल्याबद्दल डॉ. पावडे यांनी ज्येष्ठ दलित नेते, भारताचे पहिले कामगार मंत्री बाबू जगजीवन राम यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली होती. बाबू जगजीवन राम यांनी ते पत्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना पाठवलं होतं. पंडित नेहरुंनी डॉ. कुमुद पावडे यांच्या पत्राची दखल घेत त्यांना मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकर दयाळ शर्मा यांची भेट घेण्यास सांगितले होते. सोबतच नेहरुंनी पंतप्रधान सहायता निधीतून २५० रुपये मदत डॉ. कुमुद यांना त्यावेळी पाठवली होती. अशाप्रकारे डॉ. कुमुद यांना मध्य प्रदेशात पहिली नोकरी मिळाली होती.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या सोहळ्यात डॉ. कुमुद त्यांच्या आईवडिलांसमोवत सामिल झाल्या होत्या. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. 'बायजा' मासिकाच्या त्या अनेक वर्ष संपादक होत्या. अखिल भारतीय प्रागतिक महिला संघटनेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवाय १९९५ साली बिजिंग (चीन) मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत त्यांनी सहभाग घेतला होता.

 

WhatsApp channel