Sanjay Raut on RajyaMata : गायीला राज्यमातेचा दर्जा देत गोशाळांना प्रत्येक गायीमागे दररोज ५० रुपये अनुदान देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनीही तोफ डागली आहे. ‘वीर सावरकर असते तर ह्या निर्णयाबद्दल सरकारच्या कानाखाली मारली असती,’ असं राऊत म्हणाले. तसंच, भाजपशासित गोवा व अरुणाचल प्रदेशमध्ये गोमांस विक्रीवर बंदी का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते पत्रकारांशी बोलत होते. 'काही तैलबुद्धीचे लोक असतात, काही बैलबुद्धीचे असतात. सध्याचं सरकार बैलबुद्धीचं आहे. त्यांची बुद्धी बैलाची आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना काही काम उरलेलं नाही, असं राऊत म्हणाले.
‘आम्ही गोमातेला मानतो. गायीची पूजा करतो. ते आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाही. त्यासाठी सरकारी आदेशाची गरज नाही. हे सगळं करताना भाजपशासित राज्यात गोमातेच्या कत्तली होतात, त्यावर कधीतरी बोला. गोवा,अरुणाचलमध्ये गोमांस विक्रीवर बंदी नाही. अनेक राज्यांत नाही, असं का,’ असा सवाल राऊत यांनी केला.
'राज्यमाता करून गायीचं रक्षण कसं होणार? गायीच्या दूधाला भाव द्यायला हवा. शेतकरी संघर्ष करतायत त्यावर चर्चा करा. पण ज्यांचे बाप बैल आहेत. ज्यांची बुद्धी बैलाची आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असे फंडे निवडणुकीसाठी वापरले जातात. केंद्रातले काही बैल राज्यात येतात आणि हे सगळं होतं. महाराष्ट्राला एक विद्वत्तेची, चिंतनाची परंपरा आहे. त्याचा ह्या लोकांनी बैलबाजार केला आहे, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.
'हे लोक राज्य आणि देश कोणत्या दिशेनं घेऊन जातायत कळत नाही. तुम्ही सावरकरांना मानता ना. मग सावरकरांचं गायीबद्दलचं म्हणणं समजून घ्या. नाहीतर सावरकरांचं नाव घेऊ नका. गोमातेविषयी सावरकरांच्या भूमिका मान्य आहेत का हे भाजपनं स्पष्ट करावं. सावरकर असते तर कालच्या निर्णयाबद्दल ह्यांच्या कानाखाली मारली असती, असंही राऊत म्हणाले.