विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५ जागांचे प्रचंड यश मिळाले असून एकट्या भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे स्वबळावर सत्ता स्थापन करण्यास केवळ १३ जागांची आवश्यकता आहे. भाजपचे मित्रपक्ष व काही अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला असून मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार हे जवळपास पक्के झाले आहे. आता मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा सोडला. वरिष्ठ नेते म्हणून मोदी शहा जो निर्णय घेतली तो जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच तो शिवसेनेसाठीही अंतिम असेल असे शिंदेंनी जाहीर केले. त्यांच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"जे स्वत:लाशिवसेना समजतात. त्यांनी त्यांच्यापक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शहा यांना दिले असतील तर त्यांनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये, तसा त्यांना अधिकारही नाही, असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार मोदी-शहांकडे सोपवल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, प्रश्न असा आहे की त्यांचा असा दावा कसा असू शकतो? जे स्वत:ला शिवसेना मानतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. जर शिवसेना निवडणूक आयोगाने तुमच्या हातात दिलेली आहे. त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मोदी-शहांना देत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचा स्वाभिमान,अभिमान असं बोलू नका,"असा टोला राऊतांनी लगावला आहे.युतीमधील दोन पक्षांनी निर्णयाचे अधिकार दिल्लीला दिले आहेत. आता दिल्ली ठरवणार महाराष्ट्रचं भविष्य,असं उत्तर दिलं.
मुख्यमंत्रिपदासाठी गेल्या तीन दिवसापासून दिल्लीत खलबतं सुरु असून भाजपा मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं की, धक्कातंत्राचा वापर करून मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा दिला जातो, याची उत्सुकता आहे. त्यातच आज शहांनी विनोद तावडे यांच्यासोबत महाराष्ट्रातील स्थितीबाबत चर्चा केल्यानं त्यांचं नावही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं आहं.
दरम्यान बुधवारी एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्य़मंत्रीपदासाठी भाजपचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो मान्य असल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे म्हणाले, मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. लाडका भाऊ मिळालेली ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे.