Sanjay Raut News: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तीन ते चार नावांची निवड केली होती, पण त्यात शिवसेना यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नव्हते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, २०१९ मध्ये फडणवीसांना शरद पवारांच्या नियोजनाबद्दल माहिती होते का? फडणवीसांनी १०० वेळा जन्म घेतला तरी त्यांना शरद पवारांच्या डोक्यात काय चालले आहे, हे समजणार नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत शिल्लक असेल तर त्यांनी निवडणुकीची हाक द्यावी, असाही त्यांनी इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्रातील पक्षांमध्ये आणि या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या कुटुंबांमध्येही फूट पाडली, असा आरोप राऊत यांनी केला. राऊत पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात राजकीय पक्ष आणि कुटुंबे कोणी फोडली? मोदी आणि शहा यांनी राजकीय पक्षांमध्ये आणि अगदी कुटुंबातही फूट पाडली. एकनाथ शिंदे आणि अजित पवारही याला बळी पडले. त्यांना धमकावले गेले, त्यांच्यावर दबाव आणला गेला किंवा पक्षातून बाहेर पडण्याचे आमिष दाखवण्यात आले, हे त्यांनी मान्य केले पाहिजे.’
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंड शिवसेना असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, दोन्ही पक्षांनी शिंदे आणि अजित पवार यांना अनेक वर्षे भरपूर संधी दिली, पण त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला, असेही संजय राऊत म्हणाले. मणिपूर आणि त्यांच्या मुंबई दौऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी मणिपूरवरून शहा यांच्यावर टीका केली. 'मणिपूरमधील ताजे हल्ले आणि महिलांचे सातत्याने होणारे हाल असतानाही केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहेत. शहा यांनी मणिपूर, जम्मू-काश्मीरमध्ये जावे. मुंबईत त्यांचा काय काम आहे? मणिपूरला जाण्याचे धाडस त्यांनी दाखवावे,' असेही ते म्हणाले.
नुकतीच शहा यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. 'अमित शहा लालबागचा राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊ द्या! मला तर सारखी भिती वाटते. ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग, संस्था त्यांनी गुजरातमध्ये पळवल्या. त्याप्रमाणे एकदिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाही का? होऊ शकते. हे लोक काहीही करु शकतात.'