Sanjay Raut News in Marathi : ‘सैफ अली खान हा काही दिवसांपूर्वीच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटला होता. त्यानंतर त्याच्यावर झालेला हल्ला हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही धक्काच आहे,’ असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'राज्यात सर्वसामान्य माणसं सुरक्षित नाहीतच, पण ज्यांना सुरक्षा असते त्या कलाकरांच्या घरातही चोर घुसायला लागलेत. त्यामुळं सरकार पुन्हा उघडं पडलंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. 'महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. सरकार सभासंमेलनं उत्सव, पंतप्रधानांनाचं आगत-स्वागत, शिबिरं यात गुंतून पडलंय. बीडपासून मुंबईपर्यंत कुठंही कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही, असं राऊत म्हणाले.
'सैफवर हल्ला झाला. काल पंतप्रधान मुंबईत होते. त्यामुळं सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडं असणार. राज्यात काय चाललंय हा प्रश्न एकदा राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:ला विचारायला हवा. आम्ही त्यांच्याबद्दल काही बोललं की त्यांना वेदना होतात, असा टोला राऊत यांनी हाणला.
राज्यात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्ता, झोपड्या, चाळी कुठंही चोर दरोडेखोर घुसतायत. आता तर जिथं सुरक्षा व्यवस्था असते, त्या कलाकारांच्या घरातही चोर घुसायला लागलेत. १५ दिवसांपूर्वीच सैफ सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता. पंतप्रधान त्यांच्यासोबत १ तास होते. त्यानंतर हा हल्ला झालाय. हा चोरानं केलाय की आणखी कोणी हा पुढचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
'महाराष्ट्रात कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. राज्यातले ९० टक्के पोलीस महायुती म्हणून जो काही प्रकार आहे, जे काही फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेत आहे. आमचा शाखाप्रमुख फुटला तर त्याला दोन गनर दिले जातात. उपतालुकाप्रमुखाला १ गनर, जिल्हाप्रमुखाला ५ गन दिले जातात. गद्दार, बेईमान, भ्रष्टाचाऱ्यांना पूर्ण सुरक्षा आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
'सैफ अली खान हा पद्मश्री विजेता आहे. त्यामुळं त्यालाही सुरक्षा असणार. पण तरीही हल्ला झाला. याचा अर्थ पद्मश्री मिळालेली व्यक्तीही मुंबईत सुरक्षित नाही. आता चोराला पकडतील. पण किती चोरांना पकडणार. कायद्याची भीतीच कोणाला राहिली नाही. सरकार पुन्हा एकदा उघडं पडलंय, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या