Badlapur Case : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार व पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. हात बांधलेले असताना व तोंडावर बुरखा असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांवर हल्ला कसा केला, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात पोलीस हे अक्षय शिंदे याला कुठेतरी नेताना दिसत आहेत. त्यावेळी अक्षय शिंदे याच्या तोंडावर बुरखा आहे. त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसत आहेत. त्याच व्हिडिओकडं लक्ष वेधून राऊत यांनी प्रश्न केला आहे. 'अशा अवस्थेतील पोरानं पोलिसांवर हल्ला कसा केला. नक्की काय घडलं? महाराष्ट्राला हे सत्य कळायलाच हवं, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
'एखाद्या गुन्हेगारासाठी हळहळण्याचा कारण नाही. मात्र, या एन्काऊंटरमुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा जो आरोपी होता, तो शाळेत सफाई कामगार होता. संडास साफ करण्याचं काम करत होता. असा मुलगा बंदूक कधीपासून चालवायला लागला. पोलिसांच्या कमरेवरील बंदूक हिसकावली. लॉक असलेली बंदूक चालवून त्यानं गोळीबार केला हे कोणाला पटेल का? पटू शकतं का?, असे प्रश्न संजय राऊत यांनी केले.
बदलापूर प्रकरण उघडकीस आल्यानंतर जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, लगेच फाशी द्या अशी मागणी जनतेनं केली होती. संतापलेल्या लोकांनी मंत्री, अधिकाऱ्यांना पिटाळून लावलं. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कायदा हातात घेऊ देणार नाही. खटला फास्ट ट्रॅकवर चालवू असं शिंदे म्हणाले होते. एन्काऊंटरच करायचा होता तर आंदोलकांवर गुन्हे दाखल का केले होते? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पोलिसांना आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे. त्यासाठीच त्यांनी एन्काऊंटर करून मुख्य पुरावा नष्ट केला. हा दिवसाढवळ्या केलेला खून आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
'हे फार मोठं षडयंत्र आहे. ज्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे. थोडक्यात त्यांना बलात्काऱ्यांना वाचवायचं आहे. आरोपी सापडला होता तर शाळेतील सीसीटीव्ही फूटेज का काढलं गेलं? ते शाळेच्या संस्थेनं काढलं. ही शाळा आणि संस्था भाजपशी संबंधित आहे, असंही संजय राऊत म्हणाले.