मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र विधानसभा बरखास्त झाली असून आता राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. निकाल लागून चार दिवसानंतरही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, भाजपला मिळालेले बहुमत पाहता देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे वाटत आहे. नैतिकता हेच सांगते. त्याचबरोबर हे लोक पक्ष फोडण्यातही माहिर आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. हे लोक एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा पक्ष मोडून काढतील, अशीही शक्यता आहे. पक्ष फोडण्याची कला या लोकांनी आत्मसात केली आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देईल, असे म्हणता येणार नाही. हे करणे अवघड असून देवेंद्र फडणवीस शर्यतीत आघाडीवर आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे वक्तव्य समोर आले असून त्यावरून एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजपवर नाराजी असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे शिंदे सेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे काही निर्णय घेतील ते स्वीकारले जाईल. केसरकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील त्याला सर्वजणांची सहमती असेल.
भाजपला १४० आमदारांचा पाठिंबा असल्याने मुख्य़मंत्रीपदावरचा दावा मजबूत झाला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे जपून पावले टाकताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदे यांनीह आपल्या आमदारांकडून पक्ष सोडून जाणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत.
पक्षनेत्याचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत. पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.