Sanjay Raut on Shiv Sena Verdict : शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा आज दिला. या निर्णयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. 'बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं गुजरात लॉबीचं षडयंत्र आहे. हा निकाल दिल्लीहून आला आहे. पण तुमच्या कितीही फौजा आल्या तरी शिवसेना संपणार नाही. आम्ही मरायला तयार आहोत, पण हटणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील वादावर निर्णय देताना १९९९ ची घटना ग्राह्य धरून संपूर्ण निकाल दिला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं निवडणूक आयोगाला सादर केलेली पक्षाची २०१८ सालची घटना त्यांनी अमान्य केली. तसंच, पक्षप्रमुख या पदाचे सर्वाधिकारही अमान्य केले. त्यामळं ठाकरे गटाचे सर्व युक्तिवाद निराधार ठरले व शिंदे गटाची सरशी झाली.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हा निकाल म्हणजे पाप आहे, असा घणाघात केला. 'देशातल्या प्रादेशिक अस्मिता संपवून देशात एकच पक्ष राहावा हा भाजपचा प्रयत्न आहे. भारताच्या इतिहासातील व लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. राहुल नार्वेकर हा विधानसभा अध्यक्षच मुळात बेकायदेशीर आहे. कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले, कोण विधानसभा अध्यक्ष? त्यांची औकात काय आहे? शिवसेना कोण हे ठरवणार ते कोण? अशा पद्धतीनं हा पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार त्यांना नाही, असं राऊत म्हणाले.
‘शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे. दिल्लीत बसलेले दोन-तीन गुजराती लोक हे कटकारस्थान करत आहेत. पण असं करून त्यांना मुंबई ताब्यात घेता येणार नाही,’ असं राऊत यांनी ठणकावलं.