Sanjay raut : ही सावरकर गौरव नव्हे तर अदानी बचाव यात्रा; राऊतांचा शिंदे-भाजपवर हल्ला
Sanjay Raut PC : गौतम अदानी यांनी केलेल्या लुटमारीपासून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सावरकर गौरव यात्रा काढली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
Sanjay Raut On Eknath Shinde : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वादंग पेटलेलं आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहे. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ही सावरकर गौरव नाही तर अदानी बचाव यात्रा असल्याचं म्हणत शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सावरकर यांचा आणि भाजपचा काहीही संबंध नव्हता. सावरकर हे विज्ञानवादी होते, त्यांचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नव्हतं. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकीय ढोंग करत आहेत, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. याशिवाय त्यांची सावरकर गौरव यात्रा नाही तर अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानी यांच्या लुटमारीपासून देशाचं लक्ष हटवण्यासाठीच ही यात्रा काढली जात असल्याचं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सावरकरांविषयी मुख्यमंत्र्यांना काय माहितीय?- राऊत
ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली, त्यावेळी ते सावरकरांविषयी दोन शब्द देखील उत्फूर्तपणे बोलू शकत नव्हते. त्यांच्या समोर असलेला कागद ते वाचून दाखवत होते. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावरकरांविषयी काय माहिती आहे?, सावरकरांच्या क्रांतिकारक बंधूंचं नाव तरी मुख्यमंत्र्यांना माहितीय का?, सत्ताधारी शिंदे गट हा गद्दार गट आहे, त्यामुळं ते काय सावरकर गौरव यात्रा काढणार आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे.