मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi Govt's 9 Years: 'देशाच्या नाकी नऊ आणणारे नऊ वर्ष'

Modi Govt's 9 Years: 'देशाच्या नाकी नऊ आणणारे नऊ वर्ष'

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 30, 2023 04:03 PM IST

Sanjay Raut on Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्ष ही देशाच्या नाकी नऊ आणणारी वर्ष होती, अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Rajya Sabha MP, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut
Rajya Sabha MP, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut (HT_PRINT)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्ष ही देशाच्या नाकी नऊ आणणारी वर्ष होती, अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीदेशातला दहशतवाद संपवला असं म्हणणाऱ्या भक्तांनी डोळे उघडून देशातील स्थिती समजून घेतली पाहीजे, असं राऊत म्हणाले. मोदी यांच्या कार्यकाळात देशातला दहशतवाद संपला की वाढला याचं मणिपूरमध्ये पेटलेली दंगल आणि हिंसाचार हे ज्वलंत उदाहरण असल्याचं राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, 'काश्मीरमध्ये आजही लष्करी जवानांच्या समूदायिक हत्या होत आहेत… काश्मिरी पंडितांची घरवापसी अद्याप होऊ शकलेली नाही. पंडितांचे हत्यासत्र सुरूच आहे. राजधानी दिल्लीमध्ये दररोज चार मुलींवर अत्याचार, बलात्कार होऊन त्यांचे खून केले जात आहेत. मणिपूरमध्ये देशाचे गृहमंत्रीसुद्धा पाय ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती असताना कोणता दहशतवाद कमी झाला असा सवाल राऊत यांनी यावेळी केला आहे.

उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट चर्चा सुरू

एकीकडे वंचित-बहुजन विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान आघाडीविषयी चर्चा सुरू असताना ‘आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर बसायला तयार आहोत..’ असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट चर्चा सुरू असते. शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याकडून एक प्रस्ताव मागवलेला आहे. त्यानंंतर पुढे चर्चा सुरू राहणार आहे.

धानोरकरांच्या निधनाचा धक्का शिवसेनेला देखील

चंद्रपूरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या. मूळचे शिवसैनिक असलेले धानोरकर ऐनवेळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून खासदार झाले होते. धानोरकर यांची जीवनशैली, वर्तन, वागणूक हे शिवसैनिकासारखं होतं, असं राऊत म्हणाले. धानोरकर यांनी वयाची पन्नाशी देखील पार केली नव्हती, असं राऊत म्हणाले.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या