संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका न घेतल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर निदर्शने करणारे मुस्लिम नागरिक हे सुपारी घेऊन आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक होते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. ते आज पत्रकारांशी बोलत होते. राऊत यांनी यावेळी निदर्शनं करणाऱ्या सर्व लोकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे संबंध आहेत याचा पुरावा म्हणून पत्रकारांना निदर्शकांचे एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो दाखवले.
राऊत म्हणाले, ‘वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे सध्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. त्या समितीत सर्व पक्षांचे सदस्य असणार आहे. मात्र काही लोकांनी 'मातोश्री' बाहेर येऊन गोंधळ घालत आम्हाला जाब विचारला. निदर्शकांमधील अर्धे लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. या लोकांना मातोश्रीबाहेर गोंधळ करण्यासाठी कुणी पाठवलं होतं, ही सुपारी कुणी दिली होती असा सवाल करत हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली माणसे होती, असा थेट आरोप राऊत यांनी केला.
निदर्शने करणाऱ्यांची नावे आणि त्यांचे फोटो राऊत यांनी पत्रकारांना दाखवली. यातील काही लोक ‘वर्षा’वर राहतात तर काही जण ठाण्यातील रहिवासी असल्याचं ते म्हणाले. अकबर सय्यद, सलमान शेख, अब्रार सिद्दिकी, इश्तियाक सिद्दिकी, इलियास शेख, अकरम शेख, ईशान चौधरी या आंदोलनकर्त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काढलेले फोटो राऊत यांनी पत्रकारांना दाखवले.
राऊत म्हणाले,'ही लोकं शिवसेनेच्या विरोधात, उद्धव ठाकरेंविरोधात मातोश्रीबाहेर घोषणा देत होते. वक्फ सुधारणा विधेयकावर आमचं मत विचारत होते. ते सर्व जण हे 'सुपारी गँग'चे सदस्य असून ‘सुपारी गँग’ ही ‘वर्षा’ आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेली असल्याचं राऊत म्हणाले. ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमापूर्वी गोँधळ घालणारे हे सुद्धा स्थानिक ठाण्याचे नव्हते. तेही ‘सुपारी गँग’चे सदस्य होते, असा आरोप राऊत यांनी केला. 'सुपारी गॅंग'चा प्रमुख अहमदशाह अब्दाली दिल्लीत बसला असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
राज ठाकरे यांच्यावर बीड येथे सुपाऱ्या फेकणारे शिवसैनिक नव्हते, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेला आव्हान देऊ नये असं राऊत म्हणाले. आम्हाला मराठी माणसांमध्ये आपसांत भांडणं लावायचे नाही. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यानंतर सत्ता आमच्या हातात येणार असून तेव्हा तुम्ही कुठल्या बिळात जाणार आहात, ते आम्ही पाहू, असं राऊत यांनी विरोधकांना ठणकावलं.