मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay raut : ‘..तर राजकारण सोडेन; बाळासाहेबांचं नाव सांगणार नाही’ संजय राऊतांचं शिंदे गटाला खुलं आव्हान

Sanjay raut : ‘..तर राजकारण सोडेन; बाळासाहेबांचं नाव सांगणार नाही’ संजय राऊतांचं शिंदे गटाला खुलं आव्हान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 21, 2023 12:49 AM IST

Sanjay raut challenge eknath shinde : आमच्याकडून ४०'मिंधे' गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेबांचे नाव सांगणार नाही,असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

Sanjay raut
Sanjay raut (file pic)

एकनाथ शिंदे यांनी बंड करून वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना असल्याचे संजय राऊत ठासून सांगत आहेत. गद्दारांनी न्यायालयाने चपराक दिली आहे, तशीच आता मतदारही त्यांनी धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असे म्हटले आहे. बीड येथील जाहीर सभेत बोलताना संजय राऊतांनी शिंदे गट व भाजपवर तुफान हल्ला चढवत खुलं आव्हान दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, विरोधक म्हणतात की आम्ही मोदींचा फोटो लावून मते मागितली. मात्र तसं अजिबात नाही. आमचे श्रद्धास्थान असणारे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते व अजूनही आहेत. राहिला प्रश्न मोदींच्या फोटो वापरण्याचा तर कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. तेथेही भाजपने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? आता आमच्याकडून ४० 'मिंधे'  गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेबांचे नाव सांगणार नाही, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिलं आहे.

जे आम्हाला म्हणतात की, तुम्ही मोदींचे फोटो वापरून निवडून आलात तर त्यांना सांगतो की, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, तुम्ही मोदी-शाहांचा फोटो लावा. मग तुम्हालाही कळेल की महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे आणि हिंदुत्व काय आहे. या महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत आहे. लोकांच्या मनात चीड आहे, संताप आहे. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत. कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणारच आहे.

IPL_Entry_Point