Sanjay Raut on Uddhav Thackeray : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. तर महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेतील या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून आता त्यांचे लक्ष विधानसभा निवडणुकांकडे आहे. कोण किती जागा लढवणार यावर चर्चा सुरू असतांना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून आघाडीत बिघाडी होईल का ? अशी चर्चा सुरू आहे.
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून भाष्य केले आहे. निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वामुळेच महाविकास आघाडीला यश मिळाले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुका लढतांना महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा द्यावाच लागणार आहे. सर्वाधिक जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री अस कोण म्हणत? मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. राज्याने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं ते उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. या निवडणुकीत तिन्ही पक्षाची ताकद एकत्र होती. त्यामुळे बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. किंबहुना लोक ते स्विकारणार देखील नाही. यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा द्यावाच लागेल, असे राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यावर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न देता निवडणूक लढवावी या भूमिकेवर महाविकास आघाडीतील नेते आहेत. मात्र, आज संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली आहे. राऊत यांच्या या विधानावर महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेणार या कडे आता लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या