मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?, संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस
sanjay raut and eknath shinde
sanjay raut and eknath shinde (HT)

मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?, संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस

01 April 2023, 16:35 ISTAtik Sikandar Shaikh

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना १०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस देण्यात आली आहे.

Sanjay Raut Defamation Notice : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आता लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी संजय राऊतांना तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस जारी केली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळं आता आधीच राजकीय संकटात सापडलेल्या ठाकरे गटाच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याशिवाय बंडानंतरही संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत अमर लोखंडे यांनी संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे.

बिश्नोई गँगकडून राऊतांना धमकी...

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोच्या नावानं खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर मेसेज करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं संजय राऊतांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहे.