दुर्घटनेतून चांगलं घडेल म्हणणारे मंत्री दीपक केसरकर हे तर अफजलखानची औलाद… संजय राऊत कडाडले-sanjay raut criticize remark made by deepak kesarkar on shivaji maharaj statue incident ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दुर्घटनेतून चांगलं घडेल म्हणणारे मंत्री दीपक केसरकर हे तर अफजलखानची औलाद… संजय राऊत कडाडले

दुर्घटनेतून चांगलं घडेल म्हणणारे मंत्री दीपक केसरकर हे तर अफजलखानची औलाद… संजय राऊत कडाडले

Aug 28, 2024 12:43 PM IST

sanjay raut ‘मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याच्या दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडेल’ असं अजब तर्क देणारे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रालयासमोर चपलेनं मारलं पाहिजे असं खळबळजनक विधान शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रवक्ते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दीपक केसरकरांना चपलेनं मारलं पाहिजेः संजय राऊत
दीपक केसरकरांना चपलेनं मारलं पाहिजेः संजय राऊत

‘मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याच्या दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडेल’ असं अजब तर्क देणारे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रालयासमोर चपलेनं मारलं पाहिजे असं खळबळजनक विधान शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रवक्ते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कोकणातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याची घटना ही महाराष्ट्राच्या मनावर आघात करणारी असून उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

‘मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हा अपघात आहे… कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल. त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल….’ असं अजब विधान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच केलं होतं. केसरकर यांना त्यांच्या या अजब विधानामुळे सोशल मीडियावरही ट्रोल केलं जात आहे. केसरकर यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी आज तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडेल असं म्हणणारे औरंगजेबची अवलाद असून केसरकर यांना मंत्रालयासमोर चपलेनं मारलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. 

फडणवीस हे शिवाजी महाराज विरोधीः संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराभव औरंगबेज आणि अफजलखानही करू शकला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विकृत मनोवृत्ती यामुळे महाराष्ट्रात आज शिवाजी महाराजांना पराभव पत्करावा लागला, असं संजय राऊत म्हणाले. केसरकर हे एकनाथ शिंदें यांच्या ‘गँग’चे सदस्य असून देवेंद्र फडणवीस यांनीच ही गँग तयार केली असल्याचं राऊत म्हणाले. फडणवीस हे केसरकर यांची वाहवा करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. केसरकर राज्याच्या मंत्रिमंडळात राहूच कसे शकतात, असा सवाल राऊत यांनी केला.

खासदार नारायण राणेंनी घटनेचा धिक्कार करावाः राऊत यांची मागणी

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे हे कुणाची बाजू घेत आहेत? हीच घटना इतर राज्यात झाली असती तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. म्हणाले. राणे खरे शिवभक्त असतील तर रस्त्यावर उतरून सरकारचा धिक्कार करायला हवे होते, असं राऊत म्हणाले. देशात अनेक पुतळे आहेत. नेमका हाच पुतळा कसा पडला असं सांगत मालवणमधील शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि शिल्पकार सगळे बेपत्ता झाले आहे. या भ्रष्टाचारामागे ठाणे कनेक्शन असून बेपत्ता कॉन्ट्रॅक्टर आणि शिल्पकार कुठे गेले आहे हे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विचारा, असं राऊत म्हणाले. 

पुतळ्यावरून शरद पवार-उद्धव ठाकरेंदरम्यान आज ‘मातोश्री’वर बैठक

मालवणमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर हे प्रकरण सध्या थंड होणार नाही. या घटनेनंतर लोकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे. आज मालवणमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. आदित्य ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, कॉंग्रेस नेते नाना पटोले आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.