हाथरसयेथील चेंगराचेंगरीच्या घटनेत १२१ लोकांना आपले जीवन गमवावे लागले आहे. या दुर्घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा असून भोंदुगिरी तिथूनच सुरू होते. मोदींनी पंतप्रधानांसारखे वागायला पाहिजे. पण ते गुहेत जाऊन तपस्या करतात. स्वत:ला बाबा, महाराज म्हणून घेतात. स्वत:ला देवाचा अवतार म्हणतात. माझा जन्म बायोलॉजिकल पद्धतीने झाला नाही, असे सांगतात. हिंदू-मुसलमान करतात. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे. देशाचा पंतप्रधानांनाच भोंदुगिरीतून राजकारण करायचं असेल काय करणार, अशी घमाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी हाथरस घटनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. हाथरस घटनेमध्ये भोलेबाबावर गुन्हा दाखल न करता आयोजकांवर केले आहेत. याचे कारण स्पष्ट आहे, बाबाला राजकीय संरक्षण प्राप्त आहे. सत्संगसाठी प्रशासनाने ८० हजार लोकांना परवानगी दिली असताना याच्या तिप्पटअडीच लाख लोकं कशी जमली?असा सवालही राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले की, नवी मुंबईतील खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात झालेला उष्माघाताची घटना असो किंवा उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेली चेंगराचेंगरी असो,हे सर्व अंधश्रद्धेचे बळी आहेत. या अंधश्रद्धांना आणि भोंदुगिराला राज्यकर्त्यांकडून खतपाणी घातले जाते. बुवा, महाराजांना राज्यकर्ते आणि राजकीय नेते प्रतिष्ठा देतात.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेबाबत राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी भर उन्हात हा कार्यक्रम घेतला होता. हजारो साधक तिथे जमले होते. त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती,उन्हापासून वाचण्यासाठी छप्पर नव्हते. देशाचे गृहमंत्रीही तिथे होते. यावेळी पळापळ होऊन अनेकांचे जीव गेले. यासाठी राज्यसरकारवर कारवाई झाली पाहिजे होती,असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन आसामला जातात आणि कामाख्य देवीच्या मंदिरात रेडे कापतात. यांच्यावर कोण कारवाई करणार? जिथे अंधश्रद्धा, बुवाबाजी आहे तिथे राज्यकर्ते, राजकारणी जातात. पंतप्रधान असो की मुख्यमंत्री, त्यांच्यावरही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.