पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याआपल्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक कार्यक्रमात उपस्थिती लावली. अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले. नाशिक दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी नदीकाठी राम कुंडावर जलपूजन केलं. असे करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले. त्यानंतर नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. त्यावेळी मंदिरातील भजनातही मोदी तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मोदींनी मंदिरात साफसफाईही केली. याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
२२ जानेवारीला अयोध्येच्या रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या आधी देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. मोदींनी नाशिकमध्ये रोड शो केल्यानंतर काळा राम मंदिरात पूजा,आरती केली. त्यापूर्वी त्यांनी मंदिरात जाताच हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता केली. स्वच्छता करतानाचा त्यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून संजय राऊतांनी याची गरज होती का? असा प्रश्न विचारला आहे.
संजय राऊत म्हणाले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, काळाराम मंदिरात येऊन त्यांनी साफ सफाई केली. याची खरंच गरज होती का? पंतप्रधान मंदिरात येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने मंदिरातील साफसफाईवर किमान सात ते आठ लाख रुपये खर्च केले. मंदिर अगदी चकाचक केले होते.
मंदिर ट्रस्टने देखील सफाईसाठी २ लाख रुपये खर्च केले असे समजते. बऱ्याच ठिकाणी लादीवर रेड कार्पेट टाकले होते. तरीही देशाच्या पंतप्रधानांना हाती मॉप घेऊन पुन्हा साफसफाई करावी लागली. याचा अर्थ काय? सरकारने साफसफाईच्या नावाखाली फक्त लाखो रुपये उधळले की काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.