Sanjay Raut Criticised Eknath Shinde: माझ्यावर उठसूठ आरोप केले जात आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काडी फिरवली तर तुमची लंका जाळून टाकेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. श्रीरामाला दाढी नव्हती, रावणाला दाढी होती आणि लंकाही रावणाची जळाली, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नुकताच संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊतांना एकनाश शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, “लंका त्यांचीच आहे. श्रीरामाला दाढी नव्हती, रावणाला दाढी होती. लंका रावणाची जळाली. त्यांना रामायण- महाभारत वाचायला लागेल. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले. कोणाचं काय जळत आहे, हे लवकरच कळेल. तुम्ही गेलेल्या लंकेला आम्ही लोकसभा निवडणुकीत जाळणार आहोत”, असाही इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
पुढे संजय राऊतांनी धार्मिक मुद्द्यावर आपले मत मांडले. "देशातील मुस्लीम, ख्रिश्चनसह इतर धर्मातील लोकांना घाबरवले जात आहे. धर्मांवरून वाद निर्माण केला जात आहे, याचा देशाला धोका आहे. पण महाराष्ट्रातील मुस्लीम समाज आमच्यासोबत आहे. मुस्लीम नेते, कार्यकर्ते आणि गरीब लोक आमच्याकडे येतात. तुमचे हिंदुत्व जनतेच्या घरात चूल पेटवणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्त्व जनतेचे घर जाळणारे हिंदुत्त्व आहे, असे मुस्लीम बांधव बोलत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. धर्माच्या आधारावर नव्हेतर, मानवतेच्या आधारावर रोजगार मिळाला पाहिजे. रामाबरोबर कामही झाले पाहिजे. या देशात हिंदुचा पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले."
“दाढी खेचून आणली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले. ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली- सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणाला आडवा जात नाही. परंतु, मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची मला शिकवण मिळाली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.