मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: कोठडीत असलेल्या संजय राऊतांचा लेख 'सामना'त प्रसिद्ध झालाच कसा?

Sanjay Raut: कोठडीत असलेल्या संजय राऊतांचा लेख 'सामना'त प्रसिद्ध झालाच कसा?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 08, 2022 01:08 PM IST

Sanjay Raut Saamana Column: कोठडीत असूनही संजय राऊत यांचा लेख 'सामना'त प्रसिद्ध झाल्याच्या प्रकाराची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut

ED to probe about Sanjay Raut Saamana Column: पत्रा चाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) याची गंभीर दखल घेतली आहे. हा लेख राऊत यांनीच लिहिला की दुसऱ्या कोणी त्यांच्या नावानं लिहून प्रसिद्ध केला याची चौकशी केली जाणार असल्याचं समजतं.

संजय राऊत हे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. या वर्तमानपत्रामध्ये दर रविवारी 'रोखठोक' हा त्यांचा स्तंभ प्रसिद्ध होत असतो. सध्या राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. असं असतानाही रविवार, ७ ऑगस्टच्या अंकात त्यांचा लेख छापून आला आहे. हा लेख संजय राऊत यांनीच लिहिला आहे का? लिहिला असेल तर तो त्यांनी संबंधितांपर्यंत कसा पोहोचवला? याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. 

न्यायालयानं विशेष परवानगी दिल्याशिवाय संजय राऊत हे वर्तमानपत्रांसाठी लेख लिहू शकत नाहीत. अद्याप तरी न्यायालयानं त्यांना तशी परवानगी दिलेली नाही, असंही ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. 'सामना'तील इतर कोणी हा लेख लिहिला असावा आणि अनावधानानं तो संजय राऊत यांचं नाव व फोटोसह छापला गेला असावा, अशी शक्यता शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं हे वृत्त दिलं आहे.

लेखात नेमकं काय?

संजय राऊत यांच्या नावानं रविवारी प्रसिद्ध झालेल्या लेखात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. कोश्यारी यांनी अलीकडंच मुंबई व मराठी माणसांबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांनी माफीही मागितली होती. या घटनाक्रमावर राऊत यांच्या लेखात भाष्य करण्यात आलं आहे. राऊत यांच्या लेखात ईडीवरही निशाणा साधण्यात आला आहे.

'मराठी माणसानं पैसा कमवायचं म्हटलं की, तो अपराध ठरतो. मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’नं टाळं लावलं आहे व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. राज्यपालांनी यावरही कधीतरी बोलायला हवं. पैसा मिळेल त्या मार्गानं मिळवायची संधी आज एकाच प्रांताला व समुदायाला मिळत आहे. त्यामुळं मुंबईचेच नव्हे तर इतर प्रांतांचंही अर्थकारण बिघडलं आहे, अशी टीकाही लेखातून करण्यात आली आहे.

WhatsApp channel