मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय राऊत म्हणाले, ‘जास्तीत जास्त काय होईल, शिवसेनेच्या हातून सत्ता जाईल…’
Shiv Sena leader Sanjay Raut
Shiv Sena leader Sanjay Raut (HT_PRINT)
22 June 2022, 12:45 ISTHaaris Rahim Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 June 2022, 12:45 IST
  • एकनाथ शिंदे यांच्याशी मी आज एक तास चर्चा केली. शिंदे नाराज असले तरी ते आणि त्यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लवकरच परत येतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी आज एक तास चर्चा केली. शिंदे नाराज असले तरी ते आणि त्यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लवकरच परत येतील, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिंदे यांनी कोणत्याही अटी-शर्थी पक्षासमोर ठेवलेल्या नाहीत. प्रसार माध्यमांमधून जे काही सांगितलं जातय ते अतिरंजित आहे. (Sanjay Raut says Shivsena can rise from the ashes)

ट्रेंडिंग न्यूज

आत्ताचे हे बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणल्याच्या वृत्ताचा संजय राऊत यांनी स्पष्ट इन्कार केला. ‘शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. समोरासमोर येऊन लढाई लढते. आम्हचा पक्ष संघर्ष करणारा पक्ष असून या घडामोडींमधून जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. सत्ता परत मिळवता येईल… राखेतून जन्म घेण्याची ताकद शिवसेनेत आहे. परंतु पक्षाची प्रतिष्ठा कायम राखणे हे महत्वाचे आहे’, असे महत्वाचे विधान संजय राऊत यांनी केले.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले ३५ पेक्षा जास्त आमदारांचा मुक्काम गुजरातेतील सूरतहून आज भल्या पहाटे आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकनाथ शिंदे शिवसेनेतच राहतील

‘एकनाथ शिंदे हे माझे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहे. त्यांच्यासोबत काल आणि आज आपण फोनवर बोललो आहे. त्यांनी पक्षासमोर कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नाहीत’ असं राऊत यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांना यापुढेही शिवसेनेसोबतच रहायचं आहे. गैरसमजातून काही घडलं असेल तर यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांशी सकाळीच बोललो; कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपलं आज सकाळी बोलणं झालं. शिवसेनेच्या या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत असल्याचे राऊत म्हणाले.

या घडामोडी पाहून काही पक्षांना आनंदाचं भरतं आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं विरोधकांना वाटतं. परंतु तसे होणार नाही, असं राऊत म्हणाले. आमचे आमदार कधी सूरत तर कधी गुवाहाटीला जात आहेत. आमदार फिरतील, पर्यटन करतील. आमदारांनी देश पाहिला पाहिजे, त्यामुळे देशाची ओळख होते असंही राऊत म्हणाले.