नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! राम मंदिरापासून शिवपुतळ्यापर्यंत संजय राऊत यांनी यादीच वाचून दाखवली-sanjay raut attacks narendra modi eknath shinde after collapse of shivaji maharaj statue in sindhudurg ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! राम मंदिरापासून शिवपुतळ्यापर्यंत संजय राऊत यांनी यादीच वाचून दाखवली

नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! राम मंदिरापासून शिवपुतळ्यापर्यंत संजय राऊत यांनी यादीच वाचून दाखवली

Aug 27, 2024 02:36 PM IST

Sanjay Raut Slams Narendra Modi : सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संजय राऊत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे.

sanjay raut attacks Narendra Modi : नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! संजय राऊत यांचा घणाघात
sanjay raut attacks Narendra Modi : नरेंद्र मोदींचा हात जिथं लागतो, त्याची माती होते! संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut Slams Narendra Modi : ‘नरेंद्र मोदी हे पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांचा हात जिथं लागतो, त्याची माती होते. ७० वर्षांत पहिल्यांदाच असे पंतप्रधान झाले आहेत. देश सुद्धा यांनी उद्ध्वस्त करून टाकलाय,’ अशी जहरी टीका शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी या सगळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जबाबदार धरलं. 'हात नरेंद्र मोदी हे जिथं हात लावतात, त्या प्रत्येक गोष्टीची माती होते. ती गोष्ट उद्ध्वस्त होते हे सांगताना संजय राऊत काही उदाहरणंही दिली.

'अयोध्येत राम मंदिर बनवलं, ते गळतंय. नवीन संसद भवन बनवलं, तिथं गळती लागली आहे. ज्या पुलांचं उद्धाटन केले, ते पूल उद्ध्वस्त झाले आहेत. कोस्टल रोडला गळती लागली आहे. अटल सेतूला भेगा पडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावलो तोही उद्धवस्त झाला. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा हे होतंय, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रावर ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं!

'राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं. शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं गेलं. त्यात ह्यांना किती कमिशन मिळालं ह्याचा हिशेब द्यावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार सगळे ठाण्यातले आहेत असं कळतंय. अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सरकार कारणं काहीही सांगेल. पण महाराष्ट्र आज दु:खी आहे. ह्या वेदनेची भरपाई कधीच होणार नाही. महाराष्ट्रावर ही वेळ येईल हे आम्हाला वाटलं नव्हतं, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

गद्दारांनी हा पुतळा चांगल्या मनानं बसवला नव्हता!

'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं अवघा महाराष्ट्र दु:खी आहे, पण सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना दिसत नाही. समुद्रावर वारा होता अशी कारणं देत आहे. समुद्रावर वारा असतोच. तुम्ही आम्हाला वेडे समजता का? १९३३ साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला होता, तो आजही तसाच आहे. तिथंही वारा, पाऊस तेवढाच असतो. १९५६ साली पंडित नेहरू यांनी प्रतापगडावर छत्रपतींचा पुतळा बसवला होता. तिथंही वारा असतो. पण तोही पुतळा आजही शाबूत आहे. मात्र, गद्दारांनी बनवलेला पुतळा अवघ्या ८ महिन्यांत पडला. चांगल्या मनानं हे काम झालं नव्हतं, राजकारणासाठी झालं होतं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

हवा समुद्रात नाही, एकनाथ शिंदेंच्या डोक्यात गेलीय!

'हवा समुद्रावर नाही, हवा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात गेलीय. सत्तेची हवा त्यांच्या डोक्यात आहे. शिवाजी महाराज ज्यांचे लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहिणीच्या गोष्टी करतायत. महाविकास आघाडी या मुद्द्यावर गप्प बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. 'सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.