sanjay raut allegations on vandana suryavanshi : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. या निकालात घोटाळा झाला असून तिथल्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी हा घोटाळा केला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहोतच, पण चार महिन्यानंतर सत्ताबदल झाल्यानंतर सर्वांना याचा जाब द्यावा लागेल, असंही त्यांनी ठणकावलं आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर व शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. या निवडणुकीचा निकाल अटीतटीचा ठरला. फेरमतमोजणी करून वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेनं या निकालास आक्षेप घेतला आहे.
संजय राऊत यांनी हा निकाल म्हणजे मोठा घपला असल्याचं म्हटलं आहे. वंदना सूर्यवंशी यांचा यात थेट सहभाग आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 'या मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज नाहीएत. जो चोर असतो तो सर्वात आधी सीसीटीव्ही फूटेज चोरी करतो. तिथं वंदना सूर्यवंशी या निवडणूक अधिकारी होत्या. त्यांचा इतिहास वादग्रस्त आहे. त्या महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट अधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांनी अमोल किर्तीकर यांचा निकाल दिलाय, असा आरोप राऊत यांनी केला.
‘मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज चोरीला गेला. मतमोजणी केंद्रात रवींद्र वायकर यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मोबाइल घेऊन फिरत होते. त्यांना का थांबवलं नाही? ही सगळी सूर्यवंशी यांची होती. त्यांनी आपलं कर्तव्य नीट बजावलं नाही. हा सगळा घफला वंदना सूर्यवंशी यांनी केलाय. सूर्यवंशी यांनी एमएमआरडीएपासून महसूल विभागापर्यंत तिनं काय-काय केलं हे सगळं माझ्याकडं आहे. लवकरच मी त्यांना एक्सपोज करणार आहे,’ असंही राऊत यांनी सांगितलं.
अमोल किर्तीकर यांच्या निकालाची चोरी केली गेलीय. एकनाथ शिंदे यांची गुलामी करणारे अधिकारी असतील किंवा पोलीस असतील, त्यांना ही चोरी पचणार नाही. त्यांना जुलाब होतील, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. सूर्यवंंशी या वादग्रस्त अधिकारी असूनही त्यांना तिथं बसवण्यात आलं. चार महिन्यानंतर सरकार बदलेल तेव्हा प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. सगळ्यांना जाब द्यावा लागेल. किर्तीकर हे विजयी झालेले उमेदवार आहेत. आम्ही कोर्टात जाणार आहोत. किर्तीकर विजयी होतील ही खात्री आहे, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या