Rahul Kul Daund Pune : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर तपास यंत्रणांकडून कारवाई होत असतानाच खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राहुल कुल यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत राऊत यांनी फडणवीस यांना पत्र लिहून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळं अचानक चर्चेत आलेले राहुल कुल हे कोण आहेत?, जाणून घेऊयात.
कोण आहेत आमदार राहुल कुल?
राहुल कुल हे पुण्यातील दौंड तालुक्यातील भाजपचे आमदार आहेत. याशिवाय भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी, रासप आणि भाजप असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. २००९ साली त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत रासपकडून दौंडमध्ये विजय मिळवला होता. तेव्हापासून राहुल कुल आणि राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. २०१९ साली राहुल कुल यांनी रासपला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवत राष्ट्रवादीला घाम फोडला होता. सुप्रिया सुळेंना ६ लाख ८६ हजार तर कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार मतं मिळाली होती.
विधानसभेला निसटता विजय मिळाला...
भाजपात प्रवेश केल्यानंतर राहुल कुल यांच्याविरोधात २०१९ साली राष्ट्रवादीनं रमेश थोरात यांच्यासारखा कसलेला उमेदवार रिंगणात उतरवला. अजित पवारांनी स्वत: दोंडमधील निवडणुकीत लक्ष घातलं. परंतु निकाल हाती आला तेव्हा राहुल कुल यांनी केवळ ७०० मतांनी बाजी मारली. निसटता विजय मिळाल्यामुळं राहुल कुल यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. याशिवाय राष्ट्रवादीनंही दौंड विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक पकड मजबूत करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळं आता पुढील विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या