Snake in Mid Day Meal : सांगली जिल्ह्यातील एका अंगणवाडी केंद्रात मुलांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या पाकिटात मृत साप आढळून आला आहे. या प्रकारामुळं मुलांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. माध्यान्ह भोजनाच्या पाकिटात मृत साप आला कुठून, याचा शोध आता घेतला जात आहे.
सांगलीतील पलूस येथील अंगणवाडीत हा प्रकार घडला. एका मुलाच्या पालकांनी सोमवारी कथित घटनेची माहिती दिली, असं राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी सांगितलं. हा प्रकार नेमका काय आहे याबाबत सविस्तर कळू शकलेलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
'सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रांमध्ये माध्यान्ह भोजनाची पाकिटे मिळतात. या पॅकेटमध्ये दाल खिचडी असते. पलूसमध्ये अंगणवाडी सेविकांनी सोमवारी अन्नाच्या पाकिटांचं वाटप केलं. इथल्या एका मुलाला देण्यात आलेल्या पॅकेटमध्ये एक लहान मृत साप आढळल्याचं त्याच्या पालकांचं म्हणणं आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव व अन्न सुरक्षा समितीच्या अन्य अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट दिली व पाकिटे प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी विभागाच्या प्रभारी यादव यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. सध्या या प्रकरणामुळं जी मुले अंगणवाडीत जातात किंवा तिथं दिले जाणारे खाद्यपदार्थ खातात त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. सध्यातरी या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.