मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli: रोज दीड तास मोबाईल अन् टीव्ही बंद, सांगलीतल्या गावाने घेतला निर्णय

Sangli: रोज दीड तास मोबाईल अन् टीव्ही बंद, सांगलीतल्या गावाने घेतला निर्णय

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 20, 2022 03:58 PM IST

Sangli: डिजिटल शिक्षणासाठी घेतलेल्या मोबाईलचा वापर घरात मुलं अनेक तास वेगळ्याच कारणासाठी करत असतात, तर दुसरीकडे घरी महिला वर्ग टीव्हीच्या कार्यक्रमांमध्ये गुंग झालेला असतो.

रोज दीड तास मोबाईल अन् टीव्ही बंद, सांगलीतल्या गावाने घेतला निर्णय
रोज दीड तास मोबाईल अन् टीव्ही बंद, सांगलीतल्या गावाने घेतला निर्णय

Sangli: गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळात शालेय शिक्षणात बरेच बदल झालेत. त्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाइन शिक्षण, कोरोनामुळे शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केलं आणि लहान मुलांच्या हातात मोबाईल आला. मात्र याचा अभ्यासाशिवाय इतर कारणांसाठी होणारा वापर वाढला आणि मुलांचे अभ्यासातून लक्ष बाजूला गेले. याचा शिक्षणावरही परिणाम झाला. यावर उपाय म्हणून सांगली जिल्ह्यातल्या मोहित्यांचे वडगाव या गावाने मोठा निर्णय घेतला आहे. रोज दीड तास मोबाईल अन् टीव्ही बंद ठेवण्याची सक्तीच गावात करण्यात आली आहे.

गावातील बहुतांश मुलं ही इंग्रजी माध्यमात शिकत असल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गात मोजकीच मुलं दिसत होती. सरपंच विजय मोहिते यांनी १४ ऑगस्टला घेतलेल्या आमसभेत मुलांच्या अभ्यासाबाबत महिलांनी चिंता व्यक्त केली. टीव्हीवरील मालिका, सोशल मीडियाचं अभासी जग यातले व्हिडीओ, गेम्स इत्यादीमुळे मुलांचा अभ्यासातला रस कमी झाला असल्याचं दिसून आलं. यावर उपाय म्हणून रोज सायंकाळी दीड तास मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय गावाने घेतला. गावाने यासाठी मंदिरावर भोंगा बसवला असून मोबाईल, टीव्ही बंद करण्याची आठवणसुद्धा करून दिली जाणार आहे.

डिजिटल शिक्षणासाठी घेतलेल्या मोबाईलचा वापर घरात मुलं अनेक तास वेगळ्याच कारणासाठी करत असतात, तर दुसरीकडे घरी महिला वर्ग टीव्हीच्या कार्यक्रमांमध्ये गुंग झालेला असतो. यामुळे रोज सायंकाळी सात ते साडेआठ यावेळेत घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला. तसंच याची अंमलबजावणीसुद्धा १५ ऑगस्टपासून सुरू केली.

मोहित्यांचे वडगाव या गावात प्राथमिक शाळेत १३० विद्यार्थी शिकतात, तर माध्यमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४५० इतकी आहे. मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्यात येणाऱ्या दीड तासाच्या कालावधीत या मुलांनी अभ्यास करावा असं सांगण्यात आलं आहे. तसंच आपली मुलं या वेळेत बाहेर दिसणार नाहीत याची काळजी पालकांना घेण्यास सांगितलं आहे. गावच्या अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्यांकडूनही एखादा विद्यार्थी त्या वेळेत बाहेर दिसलाच तर अभ्यासाची त्याला आठवण करून देण्यास सांगितलं जातं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या