Sangli Crime: सांगलीतील गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत गेल्या ६ महिन्यात २६ हत्येची नोंद करण्यात आली आहे. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असताना जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने कॉलेजला जाणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून जवळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना आज (०७ ऑगस्ट २०२४) सकाळी शहरातील कॉलेज कॉर्नरवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल काळे असे पीडित महिलेचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच प्रांजलचा संग्राम शिंदे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र, काही कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, दोघेही वेगळे राहत होते. दरम्यान, आज सकाळी प्रांजल कॉलेजला जात असताना संग्रामने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रांजलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पतीविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला कॉलेजला जात असताना आरोपीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला.ही घटना सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर भागात घडली.आरोपीने पत्नीवर हल्ला का केला, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील खाडिलकर रोडवर सोमवारी एका ३२ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. सागर बेलोसे असे पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नीवर हल्ला करताच जमावाने मध्यस्थी करून महिलेचे प्राण वाचवले. मात्र, त्यानंतर त्याने स्वतःच्याच हाताने आपले मनगट कापून घेतले. या नाट्यमय थरारामुळे गिरगाव परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शितल चव्हाण बेलोसे (वय, ३०) असे पीडित महिलेचे नाव आहे. आरोपी आणि पीडिताच्या लग्नाला १० पेक्षा जास्त वर्षे उलटली. त्यांना १० वर्षाचा मुलगा आहे. हे जोडपे विरार येथे वास्तव्यास होते. सुमारे महिनाभरापूर्वी कौटुंबिक वादामुळे शितलने घर सोडले आणि नालासोपारा येथील तिच्या माहेरी राहायला गेली. सागरने शितलला परत येण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला पण तिने नकार दिला, त्यामुळे संतापलेल्या सागरने भररस्त्यात तिच्यावर चाकूने हल्ला केला.