मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Whatsapp स्टेटसवर स्वतःलाच ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अन् ‘मिस यू’ असा संदेश लिहून तरुणाची आत्महत्या

Whatsapp स्टेटसवर स्वतःलाच ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अन् ‘मिस यू’ असा संदेश लिहून तरुणाची आत्महत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 22, 2023 12:21 AM IST

Sangli crime : तरुणाने व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटसठेवले. त्याचबरोबर एक ऑडिओ क्लिपहीप्रसारित करून मिस यू,असा संदेशही दिला अन् रात्रीच्या वेळी आत्महत्या केली.

मृत योगेश सचिन फाळके
मृत योगेश सचिन फाळके

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेऊन त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली व मिस यू असा संदेश लिहून एका तरुणाने जीवन संपवले आहे. योगेश सचिन फाळके (मालेवाडीकर) (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. योगेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मोबाईलवर रील बनविण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेशला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचा छंद होता. वाळव्यातील बाराबिगा परिसरात फाळके याची दोन घरे असून एका घरात त्याचे वडील दोन बहिणीसह राहतात तर दुसऱ्या घरात तो एकटाच रहात होता. डाळिंबाचा व्यापार करणारा हा तरुण सोमवारी रात्री एकटाच घरी होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले. त्याचबरोबर एक ऑडिओ क्लिपही प्रसारित करून मिस यू, असा संदेशही दिला. 

योगेशचा हा संदेश त्याच्या काही मित्रांना सकाळी दिसला. मित्रांनी तात्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क साधून योगेश कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी तो राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहिले असता त्याने तुळीला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

IPL_Entry_Point

विभाग