Sangli bus accident : वटवाघळामुळे ट्रॅव्हल्सचा अपघात, बस झाडावर आदळून चालकासह काही प्रवासी जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli bus accident : वटवाघळामुळे ट्रॅव्हल्सचा अपघात, बस झाडावर आदळून चालकासह काही प्रवासी जखमी

Sangli bus accident : वटवाघळामुळे ट्रॅव्हल्सचा अपघात, बस झाडावर आदळून चालकासह काही प्रवासी जखमी

Jul 06, 2024 11:23 PM IST

Sangli Bus Accident : बागेच्या कठड्याला आणि लोखंडी जाळीला घासत बस पुढे निघून गेली व समोर असलेल्या गुलमोहोराच्या झाडाला जोराने धडकली.झाडाला धडकून बस जागीच थांबली.

 बस झाडावर आदळून चालकासह काही प्रवासी जखमी
बस झाडावर आदळून चालकासह काही प्रवासी जखमी

सांगलीत एका आराम बसला अपघात झाल्याचे समोर आले आहे. वटवाघळामुळे हा अपघात झाला आहे. सांगलीतील कर्मवीर चौकाजवळ शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाला. अशोका कंपनीची खासगी आराम बस मिरजेकडून मुंबईकडे निघाली होती. कर्मवीर चौकाजवळ बस आल्यानंतर एक वटवाघूळ बसमध्ये शिरले. वटवाघूळ चालकाच्या केबिनमध्ये आल्यानंतर चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याकडेला असलेल्या बागेच्या कुंपणावर आदळली. बागेवर लावलेल्या लोखंडी जाळीवर बस कलंडली. बसच्या धडकेच रस्त्याकडेचे झाड तुटून पडले.

या अपघातात सुदैवाने कोणताही जिवीत हानी झाली नाही. मात्र चालकासह काही प्रवासी जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसारअशोका ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस (एमएच ०९ जीजे ५४५४) ही रात्रीच्या सुमारास मिरजेकडून सांगलीमार्गे मुंबईकडे निघाली होती. विश्रामबागजवळ सांगलीकडे येताना कर्मवीर चौकाजवळ जिल्हा बँकेजवळ चालकाच्या केबिनमध्ये वटवाघूळ घुसले. वटवाघूळ चालकाच्या हाताला चिटकल्यामुळे चालकाने हात झटकला. या प्रयत्नात चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला व बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या उतारावरून खाली येत सार्वजनिक बागेच्या कुंपणावर आदळली.

बागेच्या कठड्याला आणि लोखंडी जाळीला घासत बस पुढे निघून गेली व समोर असलेल्या गुलमोहोराच्या झाडाला जोराने धडकली. झाडाला धडकून बस जागीच थांबली. या धडकेत झाड तुटून पडले आहे. तसेच बसच्या समोरील काचा फुटल्या आहेत. बसच्या समोरच्या बाजुचे मोठे नुकसान झाले आहे.

बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरील वाहनधारक आणि सर्व्हीस रस्त्याशेजारी राहणारे नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिकांनी आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बसमधील एक-दोन प्रवासी जखमी झाले आहेत. तर काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुखरूप असलेल्या प्रवाशांना त्याच कंपनीच्या अन्य बसेसमधून मुंबईकडे रवाना केले. तर चालकासह जखमी प्रवाशांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीनंतर झाडाच्या फांद्या तोडून बस बाहेर रस्त्यावर आणली गेली. अपघात प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे. मार्केट यार्ड ते कर्मवीर चौकापर्यंतरस्ता अरुंद असल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत असतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर