Sangli Sudhar Khade Murder : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार ऐन रंगात आला असताना सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख तर सध्याचे भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावर आज सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता, याच वादातून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाली. सुधाकर खाडे हे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी मनसेला राम राम करत भाजप पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून त्यांनी २०१४ मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
खाडे हे पंढरपूर मिरज मार्गावरील राम मंदीराच्या जागेच्या वादातून एका व्यक्तिशी भेटण्यासाठी गेले होते. दोघामध्ये यावरून वाद झाला. या वादातून संबंधित व्यक्तिने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यात खाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहे. खाडे यांनी त्यांच्या राजकीय करकीर्दीला शिवसेनेतून सुरवात केली होती. त्यांची अशी हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.