Deepak Kesarkar vs Sandipan Bhumre : शिवसेनेतील ४० आमदारांचं बंड फसलं तर एकनाथ शिंदे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली असती, असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. त्यामुळं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील धुसपूस समोर आली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळं शिंदे गटाचे मंत्री, नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संदीपान भुमरे यांनी केसरकरांच्या दाव्याचं खंडन करत त्यांना जोरदार टोला हाणला आहे. त्यामुळं आता शिंदे गटाच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळं विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास आयतं कोलित मिळालं आहे.
मंत्री दीपक केसरकर यांच्या दाव्याचं खंडन करताना मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, बंडाच्या काळात मी सतत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. त्यावेळी ज्या काही घडामोडी होत होत्या, त्याची मला संपूर्ण माहिती होती. बंडाच्या काळात एकनाथ शिंदे हे कधीही तणावात नव्हते. तसेच बंड फसलं तर स्वत:वर गोळ्या घालून आत्महत्या करेन, असं काहीच ते बोलले नव्हते, असं म्हणत संदीपान भुमरे यांनी दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर घुमजाव केला आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्यावरील दाव्यावरून शिंदे गटाचे दोन मंत्री आपापसांत भिडल्याचं दिसून येत आहे. याच कारणावरून शिंदे गटात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे. संदीपान भुमरे यांनी दीपक केसरकर यांना जाहीरित्या फटकारल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याचीही चर्चा आहे.
शिवसेनेतील बंड फसलं तर मी आमदारांना परत पाठवलं असतं. आमदारांना परत पाठवून मी डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं एकनाथ शिंदे म्हणाल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केला होता. एकाही आमदाराचं नुकसान होता कामा नये, जीव गेला तरी चालेल. असा विचार ठेवणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या नेत्यासोबत लोकं उभं राहणार नाहीत तर कुणासोबत उभं राहणार?, असा सवाल करत दीपक केसरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं होतं. त्यानंतर आता संदीपान भुमरे यांनी त्यांच्या वक्तव्याचं खंडन केलं आहे.
संबंधित बातम्या