Vijay Wadettiwar Post Sandip Dhurve Video: आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत असलेले भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे आता भलत्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. दहीहंडी महोत्सवात संदीप धुर्वे यांना प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत नाचण्याचा मोह आवरला नाही, ज्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगाण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
यवतमाळमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती आहे. या संकाटाच्या काळात नागरिकांची मदत करण्याऐवजी संदीप धुर्वे गौतमी पाटील हिच्या सोबत ठेका धरून नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, संदीप धुर्वे गौतमीच्या मागे पुढे करत नाचत आहेत. एका क्षणी गौतमी त्यांच्या पाठीमागे जाते आणि पुन्हा परत येऊन संदीप धुर्वे यांच्यासोबत ठेका धरते.
संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटीलसोबतचा व्हिडिओ शेअर करत विजय वडेट्टीवार म्हणाले की,'यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे', अशी टीका त्यांनी केली.
‘झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या- शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते’, अशी खंत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
'आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितके असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे', अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.