मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jitendra Awhad : सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड; जितेंद्र आव्हाडांचं विधान

Jitendra Awhad : सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड; जितेंद्र आव्हाडांचं विधान

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 06:48 PM IST

Jitendra Awhad : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य दरबाराच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे.

Jitendra Awhad On Sanatan Dharma
Jitendra Awhad On Sanatan Dharma (HT)

Jitendra Awhad On Sanatan Dharma : संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांनी मुंबईतील मीरा रोड येथे दिव्य दरबाराचा कार्यक्रम घेतला आहे. त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप असताना त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी कशी काय देण्यात आली?, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धिरेंद्र महाराज पुरस्कार करत असलेला सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ही कीड पोसली जाऊ नये, याचा विचार राज्यातील अठरापगड जातींनी करण्याची गरज असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सनातन धर्म मागच्या दारानं पुन्हा येऊ पाहतंय. शाहू-फुले आणि आंबेडकरांनी समाजात किती मोठा बदल घडवून आणला, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. धीरेंद्र शास्त्री याला मुंबईत बोलावून त्याच्या सभा घेतल्या जात आहे. हे आपलं दुर्दैवंच म्हणावं लागेल. खरंतर सनातन धर्म हा देशाला लागलेली कीड असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. सनातन धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. याच सनातन धर्मानं पाच हजाराहून अधिक वर्षे भारतात वर्णव्यवस्था राबवली. येथील ९५ ते ९७ टक्के समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम याच सनातन धर्मानं केल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ब्राह्मणांनी ब्राह्मण्यवादाविरुद्ध लढा दिला- आव्हाड

सनातन धर्मियांविरोधात गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद डांगे यांच्यासह अनेक लोकांनी लढा दिला. राज्यातील अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्यवादाविरोधात लढा दिला होता. त्यामुळं राज्यातील अठरापगड जातींनी याबाबत विचार करण्याची गरज असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point