दरवर्षी २५ जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याच्या केंद्रातील एनडीए सरकारच्या निर्णयावर संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे. आणीबाणी ही त्या वेळेची गरज होती. इंदिरा गांधी यांच्या जागी त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी असते तर त्यांनीही आणीबाणी लावली असती, असा ठाम दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. २०१४ साली देशात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या जुन्या कार्यकाळावर टीकेची झोड उठवत आले आहेत. आता त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं शुक्रवारी तशी एक अधिसूचना जारी केली आहे. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन सरकारनं भारतातील जनतेवर अत्याचार, अत्याचार केले होते, असं त्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
'भारतीय जनता पक्षाला काही काम राहिलेलं नाही. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. त्यांचं बहुमत गेलं आहे. त्यामुळं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी हे सगळं आता सुरू आहे, असं राऊत म्हणाले.
'या देशात आणीबाणी का लागू करण्यात आली? काही लोकांना देशात अराजकता पसरवायची होती. सरकारच्या आदेशांचं पालन करू नका असं आमच्या जवानांना आणि लष्कराला आवाहन करण्यात आलं होतं. रामलीला मैदानातून जाहीरपणे ही घोषणा करण्यात आली होती. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता, काही लोक देशात बॉम्ब बनवत होते आणि ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करत होते. त्यामुळं अशा परिस्थितीत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर त्यांनीही ती लादली असती, असा दावा राऊत यांनी केला.
अमित शहा यांना आणीबाणी काय होती हे माहीत नाही. तेव्हा ते किती वर्षाचे होते माहीत नाही. अमित शहा आज नकली शिवसेनेसोबत ज्या बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगान गातात, त्याच बाळासाहेबांनी आणीबाणीला जाहीर पाठिंबा दिला होता. आरएसएसनंही जाहीर पाठिंबा दिला होता, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
आणीबाणीनंतर जनता पार्टीचं सरकार आलं, अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आलं, चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्यापैकी कोणालाही कधी वाटलं नाही की संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिकोजीराव लागून गेले,' असा खोचक टोला राऊत यांनी केला.
'नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील प्रत्येक दिवस संविधानाची हत्या झालीय. असा एकही दिवस नाही की जेव्हा लोकशाहीचं संरक्षण झालं. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, भ्रष्टाचार ज्या पद्धतीनं वाढलंय ते पाहता संविधानाची हत्या झाली. मोदींचा पक्ष संविधान बदलणार आहे म्हणूनच त्यांना लोकांनी बहुमत दिलेलं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या