Isro samudrayaan : भारताने २०२३मध्ये अंतराळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली. भारताचे चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, आता ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था गगनयान मोहीम वेगाने राबवत आहे. एकीकडे भारत अंतराळात भारतीय व्यक्तीला पाठवण्याची तयारी करत असतांना, दुसरीकडे खोल समुद्रात देखील इस्रो मोठी मोहीम राबवणार आहे. इस्रो लवकरच महासागराच्या खोलीचा शोध घेण्यासाठी समुद्र यान पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. हे समुद्र यान २०२५ च्या अखेरीस समुद्रात पाठवण्यात येईल असे ते म्हणाले.
विज्ञान मंत्री रिजिजू यांनी म्हटले आहे की, भारत पुढील वर्षाच्या अखेरीस आपले शास्त्रज्ञ समुद्रात सहा किलोमीटर खाली समुद्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवणार आहे. रिजिजू यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, भारताच्या खोल समुद्रातील पाणबुडी 'मत्स्या ६०००' वर काम सुरू आहे आणि 'या वर्षाच्या अखेरीस' त्याची चाचणी घेतली जाईल. ही पाणबुडी मानवाला समुद्रातील ६ हजार मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असेल.
रिजिजू म्हणाले, 'समुद्रात ज्या ठिकाणी प्रकाश देखील पोहचू शकत नाही अशा ठिकाणी समुद्रात सहा हजार मीटर, सहा किलोमीटर खोलवर समुद्रयान पाठवले जाणार आहे. समुद्रात मानवाला घेऊन जाणारी 'मत्स्य' पाणबुडीचे काम वेगाने सुरू आहे. असे देखील रिजिजू म्हणाले.
रिजिजू म्हणाले की त्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ या वर्षाच्या अखेरीस या समुद्र यानाच्या समुद्री चाचण्या घेण्यास सक्षम होतील. रिजिजू म्हणाले, 'मला विश्वास आहे की आम्ही शास्त्रज्ञांची पथक २०२५ च्या अखेरीस म्हणजेच पुढच्या वर्षी समुद्रात ६ हजार मीटरपेक्षा जास्त खोल समुद्रात पाठवू शकू.' २०२१ मध्ये ही समुद्रयान मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 'मत्स्य ६०००' पाणबुडी वापरून क्रूला मध्य हिंद महासागरातील खोल समुद्रात नेले जाईल. याद्वारे तीन क्रू मेंबर्सना समुद्राखालील अभ्यासासाठी पाठवले जाणार आहे.
ही पाणबुडी वैज्ञानिक सेन्सर्स आणि उपकरणांनी सुसज्ज असेल आणि १२ तास चालवण्याची क्षमता असेल, जी आणीबाणीच्या परिस्थितीत ९६ तासांपर्यंत वाढवता येईल. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि जपान या देशांनी खोल समुद्रातील मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अशा मोहिमांसाठी कौशल्य आणि क्षमता दाखवून भारत या देशांच्या रांगेत सामील होण्यास तयार आहे.