मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  समृद्धी महामार्गावर बीयरचा ट्रक उलटला, दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बीयरच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची पळापळ

समृद्धी महामार्गावर बीयरचा ट्रक उलटला, दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बीयरच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची पळापळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 01, 2023 05:45 PM IST

Samruddhimahamarg Accident : अपघातानंतर ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटल्या उचलण्यासाठी नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.

Samruddhi mahamarg Accident
Samruddhi mahamarg Accident

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज पहाटे बीयरच्या बाटल्यांची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यातच उलटला. यामुळे रस्त्यावर सर्वत्र बीयरच्या बाटल्यांचा खच पडला होता. विशेष म्हणजे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बीयरचा ट्रक उलटल्याने नागरिकांची चांगलीच चांदी झाली. बीयरच्या बाटल्या पळवण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती.

सोमवारी पहाटेच्या सुमारास निलगाय रस्त्यात आडवी आल्याने ट्रक उलटला. ही घटना समृद्धी महामार्गावर महाकाळ शिवारात घडली. अपघातानंतर ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटल्या उचलण्यासाठी नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. जेवढ्या हाती येतील तेवढया बीयरच्या बाटल्या घेऊन लोकांनी पळ काढला.

नागपूरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एम एच ४० पीएम २६१५) औरंगाबाद एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील महाकाळ शिवारात ट्रकसमोर अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी एकदम ब्रेक मारला. यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात उलटला. चालक उत्तरप्रदेशमधील लखीमपूरमधील आहे.

या अपघातात ९ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.



अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्या, अशी चर्चा सुरू आहे.

 

WhatsApp channel